मनाचे श्लोक – भाग ७
॥जय जय रघुवीर समर्थ ॥
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।
तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥
जनी सज्जनी वाद हा वाढवावा।
पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥
निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।
बळें अंतरीं शोक संताप ठेला॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥
घरी कामधेनू पुढें ताक मागें।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥
करी सार चिंतामणी काचखंडे।
तया मागतां देत आहे उदंडे॥६३॥
अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।
अती काम त्या राम चित्ती वसेना॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥
नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥
धरीं रे मना आदरें प्रीति रामी।
नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥
नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।
करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥
घनश्याम हा राम लावण्यरुपी।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥
करी संकटीं सेवकांचा कुडावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥
बळें आगळा राम कोदंडधारी।
महाकाळ विक्राळ तोही थरारी॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥
सुखानंदकारी निवारी भयातें।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६९॥
सदा रामनामे वदा पुर्णकामें।
कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७०॥
॥जय जय रघुवीर समर्थ ॥