तुकोबारायांचे अभंग भाग -१०
४५१
आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥
यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।
पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥
नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।
नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥
हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥
४५२
आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥
नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥
नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥
नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥
तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
४५३
आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्याीस नये दारा ॥२॥
विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥
गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥
सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥
खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥
तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥
४५४
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥
काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥
कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥
गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥
॥५॥
सौर्यान – अभंग ११
४५५
वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥
जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥
वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥
म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥
४५६
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥
तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥
४५७
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥
कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥
याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
४५८
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥
ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥
न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥
देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥
४५९
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥
या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥
तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥
४६०
सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥
हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥
लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥
जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥
तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
४६१
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥
गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥
ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥
४६२
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥
चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥
बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥
४६३
नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥
ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥
चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥
थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥
आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥
४६४
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥
घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥
दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी ।
तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥
४६५
जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।
माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका ।
नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥
खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्याे । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्या ॥३॥
वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥
टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥
कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥
संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥
॥११॥
वाघा – अभंग १
४६६
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥
शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥
हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥
लक्ष चौर्यां शी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥
या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥
॥१॥
लळित – अभंग ११
४६७
आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥
जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥
रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥
तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥
४६८
तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥
टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥
प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
४६९
वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥
कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥
४७०
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥
संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥
तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥
४७१
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥
घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥
तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
४७२
कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥१॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥
तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥
४७३
गळित जाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥
वाइला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥
तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥३॥
४७४
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥
नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥
हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥
४७५
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥
कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥
तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
४७६
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥
नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥
अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥
४७७
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥
एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥
॥११॥
आशीर्वाद – अभंग ५
४७८
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥
विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥
तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
४७९
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥
कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥
भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥
तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥३॥
४८०
तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥
क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥
परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥
तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥३॥
४८१
अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥१॥
आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥
आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥
तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥
४८२
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥
सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥
विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥
आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥
॥५॥
४८३
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥
घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥
४८४
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥
लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥
जालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥
तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥
४८५
नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥
करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥
नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥
म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥
४८६
तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥
आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥
तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥
म्हणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥३॥
४८७
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥
आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥
चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥२॥
तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥३॥
४८८
गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥
बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥
मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥२॥
म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥३॥
४८९
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥
आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥
पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥
तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥
४९०
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥
उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥
भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥
तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥
४९१
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥
घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥
लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥
म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥
४९२
अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥१॥
जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥२॥
म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥३॥
४९३
जाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी अई ॥१॥
उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥
अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥
सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥
तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥
४९४
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥
तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
४९५
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥
असो नमो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥
४९६
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥
पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥
तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥
४९७
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥
न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥
करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥
करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥
तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥५॥
४९८
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥
टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥
येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥
प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥
४९९
बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥
घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥
तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥
५००
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥
तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन लोण ॥ध्रु.॥
एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥२॥
तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥३॥