तुकोबारायांचे अभंग भाग -२४
२३१
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
२३२
तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥१॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥
चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥२॥
खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥३॥
तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणे या भावें दुरी छंद भोळियां सवें ॥४॥
२३३
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥
न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥
२३४
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥
तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥
वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
२३५
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥
तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥
आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥
२३६
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥
हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥
२३७
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥
चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥
तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
२३८
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥
जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
२३९
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥
दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥
रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥
आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥
२४०
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥
भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥
योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥
तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥