तुकोबारायांचे अभंग भाग -६
२५१
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥
॥२॥
२५२
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥
२५३
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥
सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥२॥
भूतांच्या मत्सरें । ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥
निंदा स्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥
२५४
इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥
तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
२५५
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥५॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें ॥७॥
२५६
आणिकांच्या कापिती माना । निष्ठपणा पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥
२५७
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥४॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥
२५८
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥
२५९
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥
आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठ । येतां जातां घर बुडविलें ॥६॥
लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
२६०
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥
वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥
२६१
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥
काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रिद्धिसिद्धी ॥ध्रु.॥
असुर जयानें घातले तोडरीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥
रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥५॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥६॥
२६२
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥
२६३
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥
येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥
सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥
तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥
२६४
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥
२६५
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥
वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥
तुका म्हणे पायें । डोळा सुखावे ज्या न्यायें ॥३॥
२६६
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥३॥
२६७
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥
ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥
बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥
मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥
अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
२६८
साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥
परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥
आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥५॥
२६९
दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥
करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥
वर्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥
२७०
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥२॥
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥३॥
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥५॥
२७१
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥३॥
२७२
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥
नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥
आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥
नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥
२७३
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥
२७४
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥
सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥
संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥
तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥३॥
२७५
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥
ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥
विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥
२७६
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥
विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥
सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥
तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥
२७७
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥
२७८
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥
तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥२॥
कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥
२७९
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥
२८०
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥
अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥२॥
तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥
२८१
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥
परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥
२८२
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥
हनुमंतस्तुति – अभंग ४
२८३
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥
२८४
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥२॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥
जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥
तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥
२८५
काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥१॥
तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥
शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥
रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥
२८६
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
॥४॥
२८७
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥१॥
ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥
हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥२॥
तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥
२८८
मांडे पुर्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥
तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥
२८९
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥
२९०
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥
तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥
२९१
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥
२९२
मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
२९३
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥
पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥
तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥३॥
२९४
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥
अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥२॥
खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥३॥
देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥४॥
२९५
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥
म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥
सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥३॥
२९६
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥
पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
२९७
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥
कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥
तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥
कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥
तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥
२९८
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥
२९९
आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥
दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥३॥
३००
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥
खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥
स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥
सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥