तुकोबारायांचे अभंग भाग -७
३०१
माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥
कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥
तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥
३०२
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
३०३
छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥
येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥
नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥
तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
३०४
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥
मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥
संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥
कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥
३०५
अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥१॥
एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥
चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥२॥
तुका म्हणे नसे संचित हें बरें । तयासि दुसरें काय करी ॥३॥
३०६
धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥
३०७
अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥
विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥
तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥
३०८
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥
नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥
जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥
तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥
३०९
एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥
दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥
एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥
एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥
एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥
वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥
३१०
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥
आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥
देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥
तुका म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥३॥
३११
भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥१॥
धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥
नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥२॥
हें ना तें सें जालें । तुका म्हणे वांयां गेलें ॥३॥
३१२
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥
तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥
३१३
करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥
शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥
आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥४॥
३१४
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥
अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥
तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥३॥
३१५
वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥
विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥
३१६
विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥
बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥
३१७
येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥
३१८
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥
बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥
३१९
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥
३२०
बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥
भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥
सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥
गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥
तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥
३२१
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥
आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥
३२२
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥
तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥
पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥
तुका म्हणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥
३२३
ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥१॥
तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥
ठेविला तो ठेवा । अभिळाषें बुडवावा ॥२॥
मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥
३२४
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥
तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥
३२५
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥
वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥
कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥
३२६
पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥
तुका म्हणे जपें । संतांचिया जाती पापें ॥३॥
३२७
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥
दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥
दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥२॥
तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥३॥
३२८
शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥१॥
ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥
लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥२॥
तुका म्हणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥३॥
३२९
वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥
नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥२॥
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥३॥
३३०
मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥१॥
नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥२॥
झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥३॥
३३१
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥२॥
मळिालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥३॥
नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥४॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥५॥
मरण मुक वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥६॥
तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥७॥
३३२
जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥
सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥२॥
नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥३॥
उपजोनि संसारीं । एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥४॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥५॥
तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥६॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥७॥
३३३
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥
बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥
तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥
३३४
म्हणवितों दास । मज एवढी च आस ॥१॥
परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥
बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥२॥
तुका म्हणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥३॥
३३५
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥
हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥
तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हां संतां ॥३॥
३३६
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥१॥
वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥
सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥
३३७
आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठ अतिवादी ॥१॥
याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥
काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥२॥
तुका म्हणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥३॥
३३८
बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥१॥
बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ।
जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥
मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।
विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥२॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥३॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥४॥
वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।
तुका म्हणे सुखी । केलीं आपणासारिखीं । स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥५॥
३३९
अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।
उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥३॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥
३४०
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥
तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥
३४१
नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥१॥
पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥
लटिक्याचे पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥
तुका म्हणे नाव । आम्हां सांपडला भाव ॥३॥
३४२
अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥१॥
आपुलालें तुम्ही करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥
देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥२॥
देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥३ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥४॥
तुका म्हणे होसी भावें चि तूं मुक्त । काय करिसी युक्त जाणिवेची॥५॥
३४३
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥
३४४
सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
३४५
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्ति भेदु।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥२॥
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥३॥
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका म्हणे जो विटला जाणीवेस रे ॥४॥
३४६
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥
सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
३४७
जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥
३४८
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥
नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥
३४९
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥
जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
३५०
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥
कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥२॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥