मनाचे श्लोक – भाग ३

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥ समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post