मनाचे श्लोक – भाग ८

/ बालसंस्कार

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

जयाचेनि नामें महादोष जाती।
जयाचेनि नामें गती पाविजेती॥
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥

न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥
महाघोर संसारशत्रु जिणावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥

देहेदंडणेचे महादु:ख आहे।
महादु:ख तें नाम घेता न राहे॥
सदाशीव चिंतीतसे देवदेवा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥

बहुतांपरी संकटे साधनांची।
व्रते दान उद्यापने ती धनाची॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥

समस्तामधे सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।

करी काम निष्काम या राघवाचे।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥
करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता।
वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।
तरा दुस्तरा त्या परा सागराते॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।
करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

Share this Post