नाम व त्याचे प्रकार
शब्द आणि शब्दांच्या जाती-
अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे शब्द होय. शब्दांचे खालीलप्रमाणे प्रकार आहेत.

विकारी शब्द
ज्या शब्दांमध्ये लिंग ,वचनं, आणि विभक्तीमुळे बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात.
नाम-
कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी किंवा संबोधण्यासाठी जे विकारी शब्द वापरण्यात येतात ते शब्द म्हणजे नाम होय.
थोडक्यात एखाद्या व्यक्तीला, वस्तूला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनाही नाम असे म्हणतात.

अ) सामान्यनाम –
एकाच गटाच्या किंवा जातीच्या पदार्थांच्या सामान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात.सामान्यनामांचे अनेकवचन होते. सामान्यनामांमध्ये एखादी वस्तू, प्राणी ज्या नावाने ओळखला जातो त्या प्रकारचा किंवा जातीचा बोध होतो म्हणून सामान्यनामास जातीवाचक नाम असेही म्हणतात.
उदा.- मुलगी, मुलगा, हत्ती,गाव, नदी
सामान्यनामाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.
१) पदार्थवाचक नाम –
जे घटक संख्येत न मोजता शक्यतो लिटर, मीटर किंवा किलो- ग्राम मध्ये मोजले जातात त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदा.- पाणी, कापड, लोखंड
२) समूहवाचक नाम –
सामान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या समूहाला जे नाव दिलेले असते त्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात.
उदा.- संघ, मोळी
ब) विशेषनाम
एखाद्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्ती , प्राणी किंवा वस्तूचा बोध होतो अशा नामाला विशेषनाम असे म्हणतात.
विशेषनाम हे एकवचनी आणि व्यक्तिवाचक असते.
उदा.- राधा, मोहन, हिमालय, नर्मदा, भारत, पुणे, मुंबई, सचिन, नेपाळ, ताजमहाल, सूर्य इ.
क) भाववाचक नाम
ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेऊ शकतो तसेच ज्या नामातून एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वास्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा.- नम्रता, चांगला, राग , दुःख.
पुढीलप्रमाणे प्रत्यय वापरून भाववाचक नाव साधता येतात.
शब्द | प्रत्यय | भाववाचक नाम | इतर उदाहरणे |
श्रीमंत | ई | श्रीमंती | चोरी, गरीबी, गोडी, वकिली |
पाटील | की | पाटीलकी | मालकी, आपुलकी, भिक्षुकी |
सम | ता | समता | क्रूरता, नम्रता, वीरता, एकता |
मनुष्य | त्व | मनुष्यत्व | जडत्व, मित्रत्व, शत्रुत्व |
गंभीर | य | गांभीर्य | धैर्य, माधुर्य, शौर्य |
गोड | वा | गोडवा | ओलावा, गारवा |
थोर | वी | थोरवी | जोडवी |
नवल | आई | नवलाई | दांडगाई,महागाई, दिरंगाई, चतुराई |
गुलाम | गिरी | गुलामगिरी | दादागिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी |
शहाणा | पण/ पणा | शहाणपण/पणा | देवपण, वेडेपणा, मोठेपण |