वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

पृथक म्हणजे वेगळे करणे आणि वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करुण त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध वेगळा करून दाखविणे होय.

उद्देश विभाग/ उद्देशांग

१) उद्देश (कर्ता) –

वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा उद्देश/ कर्ता असतो. उद्देश जरी क्रियेमध्ये सहभागी नसला तरी वाक्यातील क्रियापद उद्देशाशी संबंधित असते.  क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते तो त्या वाक्याचा कर्ता असतो.

उदा.

राम राजा होता. (राम – उद्देश )

राम शाळेत जातो. (राम – कर्ता )

मेघाला थंडी वाजते. (वाजणारे कोण/काय ? – थंडी )

मला जहाज दिसते. (दिसणारे कोण/ काय ? – जहाज )

मोहाचा बैल मेला. (मरणारे कोण/काय? – बैल)

मला आंबा आवडतो. (आवडणारे -कोण/काय?- आंबा)

मोहनच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?- दरवाजा)

२) उद्देश विस्तार

वाक्यामध्ये जर उद्देश/कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

उदा.

मुसळधार पाऊस पडला.

नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

विधेय विभाग/ विधेयांग –

१) विधेयपूरक / विधानपूरक

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्ता व क्रियापद सोडून इतर कोणत्याही शब्दांची गरज असेल तर त्या शब्दांना विधेयपूरक / विधानपूरक असे म्हणतात.

विधानपूरकाचे कर्म व विधीपूरक असे  दोन प्रकार पडतात.

अ) कर्म –

वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते.

उदा.

रामने पाण्याचा हंडा उचलला. (या वाक्यात उचलण्याची क्रिया हंड्यावर वर झाली म्हणून ते कर्म).

रामने जनावरांना चारा टाकला. (या वाक्यात टाकण्याची क्रिया चाऱ्यावर झाली म्हणून ते कर्म).

कर्म विस्तार –

कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्मापूर्वी आला असेल तर त्याला ‘कर्म विस्तार’ असे म्हणतात.

उदा.-

रामने पाण्याचा भरलेला हंडा उचलला.

रामने जनावरांना हिरवा चारा टाकला.

ब) विधीपूरक

कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर तो शब्द  ‘विधीपूरक’ असतो.

उदा.

भरत राजा झाला.

महेश वकील आहे.

रात्रीच्या चांदण्यात समुद्रकिनारा मोहक भासतो.

वरील वाक्यांमध्ये राजा, वकील, मोहक हे शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना ‘विधीपूरक’ असे म्हणतात.

२) आधारपूरक

वाक्यामधील गतिवाचक क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काही शब्दांची गरज भासते अशा शब्दांना आधारपूरक  शब्द असे म्हणतात. क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यास आधारपूरक शब्द उत्तर म्हणून मिळतो.

उदा.-

तो पुण्याला गेला.

महेशने कपाटात पुस्तक ठेवले.

३) विधेय विस्तार

विधेय म्हणजेच क्रियापद होय. वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्‍या शब्दांचा विधेय विस्तारामध्ये समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

उदा.

काल दुपारी महेश सिनेमा पाहायला गेला होता.

उद्या सकाळी आपण रेल्वेने पुण्याला जाऊ.

४) विधेय/क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.

उदा.

महेश क्रिकेट खेळतो.

गवळी गावातून रोज सकाळसंध्याकाळ दूध गोळा करतो.

राम शेतात काम करतो.

Share this Post