संधी:-स्वर संधी

/ मराठी व्याकरण

जोडाक्षरे:-

ज्या अक्षरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास  ‘जोडाक्षर’ म्हणतात.

उदा.

अमृतध्वनी- अ + म् +ॠ+त्+अ+ध्+व्+अ +न्+ई

शत्रू- त्रू : त + र + ऊ

जोडाक्षरे मुख्यतः दोन पद्धतीने लिहितात.

आडवी पद्धत – या पद्धतीत एकापुढे  एक अक्षरे लिहिली जातात.

उदा.- व्कचित  

उभी पद्धत – या पद्धतीत एकावर एक अक्षरे लिहिली जातात.

उदा.- क्वचित

संधी:-

जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो त्याला संधी  म्हणतात. 

उदा.-सूर्योदय – सूर्य + उदय  

        सूर्यास्त – सूर्य + अस्त

        पुरुषार्थ – पुरुष + अर्थ

संधीचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

१) स्वरसंधी

२) व्यंजन संधी

३) विसर्गसंधी

१) स्वर संधी –

एकमेकांशेजारी येणारे वर्ण  जर स्वरांनी जोडले असतील तर अशा संधीस ‘स्वरसंधी’ म्हणतात.  एका  पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या प्रक्रियेलाही स्वरसंधी असे म्हणतात.

उदा.- गुरूपदेश – गुरु + उपदेश

अ) दीर्घत्व संधी –

दोन सजातीय र्‍हस्व किंवा दीर्घ स्वर एकापाठोपाठ एक आले असता असे स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात.

उदा.

सूर्यास्त – सूर्य+अस्त

रूपांतर – रूप + अंतर

विदयामृत – विद्या + अमृत

हिमालय – हिम+आलय

राजाश्रय – राजा + आश्रय

ब) आदेश संधी –

काही ठिकाणी संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो म्हणजेच वर्ण बदल होतो त्या संधीस आदेश संधी म्हणतात.

आदेश संधीचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

१) गुणादेश –

जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल त्या वर्णामध्ये होतात त्यास गुणादेश असे म्हणतात.

 अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आला तर त्या दोघांऐवजी ए हा स्वर येतो.

 अ किंवा आ या स्वरापुढे जर उ किंवा ऊ हा स्वर आला तर त्या दोघांऐवजी ओ हा स्वर येतो.

 अ किंवा आ या स्वरापुढे जर ऋ हा स्वर आला तर त्या दोघांऐवजी अर येतो.

उदा.

महर्षी – महा+ऋषी

उमेश – उमा + ईश

महोत्सव- महा + उत्सव

वसंतोत्सव – वसंत+उत्सव

प्रश्नोत्तर – प्रश्न + उत्तर

चंद्रोदय – चंद्र + उदय

धारोष्ण – धारा+उष्ण

२) वृद्ध्यादेश-

जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ऐ , औ  असे स्वर तयार होतात त्यास वृद्ध्यादेश असे म्हणतात.

जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आला तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो.

जर अ आणि आ या स्वरापुढे ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. 

उदा.

एकैक = एक+एक

प्रजैक्य – प्रजा + ऐक्य

क्षणैक – क्षण+एक

जलौघ – जल + ओघ

मतैक्य – मत+ऐक्य

सदैव – सदा+एव

गंगौघ  – गंगा+ओघ

३) यणादेश-

जर इ, उ, ऋ, (ऱ्हस्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आला तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते.

म्हणजेच जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन य , र, व असे बदल होतात त्यास यणादेशअसे म्हणतात.

उदा.

व्यासंग – वि + आसंग

इत्यादी – इति+आदी

अत्यंत – अति + अंत

प्रत्येक –  प्रति+एक

प्रत्यक्ष – प्रति+ अक्ष

अत्याचार – अति + आचार

अत्युत्तम – अति+उत्तम

४) विशेष आदेश –

जर ए, ऐ, ओ आणि औ या स्वरांपुढे एखादा स्वर येऊन त्याबद्दल अय्,आय्,अव्, आव् , आवि, अवी असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विशेष आदेश संधी तयार होते. 

ए या स्वरापुढे जर अ स्वर आला तर त्या दोघांऐवजी अय्/अय हा स्वर येतो.

ऐ या स्वरापुढे जर अ स्वर आला तर त्या दोघांऐवजी आय्/आय हा स्वर येतो.

ओ या स्वरापुढे जर ई स्वर आला तर त्या दोघांऐवजी अवी हा स्वर येतो.

औ या स्वरापुढे जर इ स्वर आला तर त्या दोघांऐवजी आवि हा स्वर येतो.

ओ या स्वरापुढे जर अ स्वर आला तर त्या दोघांऐवजी अव्/अव हा स्वर येतो.

औ या स्वरापुढे जर अ स्वर आला तर त्या दोघांऐवजी आव् /आव हा स्वर येतो.

उदा.

पावन – पौ +अन

नयन – ने+अन

गायन – गै+अन

नाविक – नौ +इक

) पूर्वरूप संधी –

मराठीमध्ये कधी कधी संधी होत असतांना एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसर्‍या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.

उदा.

नाहीसा- नाही + असा

काहीसा- काही+असा

केलेसे – केले+असे

चांगलेसे – चांगले + असे

खिडकीत = खिडकी+आत

६) पररूप संधी –

मराठीमध्ये कधी कधी एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दूसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.

उदा.

हरेक – हर + एक

घामोळे – घाम+ओळे

घरी- घर+ई

नुमजे – न+उमजे

हातून – हात + ऊन

सांगेन- सांग+एन

Share this Post