समास
मराठीमध्ये बोलताना आपण शब्दांतील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून जे सोपे, सुटसुटीत शब्द तयार करतो, अशा शब्दांच्या जोडणीला किंवा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.अशा रीतीने तयार झालेल्या जोडशब्दाला मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात.
सामासिक विग्रह-
सामासिक शब्द कोणकोणत्या शब्दांपासून तयार झाले आहेत हे पाहण्यासाठी आपण त्या शब्दांची फोड करतो म्हणजेच विग्रह करतो आणि या विग्रह करून दाखवण्याच्या पद्धतीस समासाचा विग्रह असे म्हणतात.
पद –
समासात कमीत कमी दोन शब्द असावेच लागतात आणि या दोन शब्दांना पद असे म्हणतात.
समासात कोणत्या पदाला जास्त महत्व दिले आहे यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.
अ) अव्ययीभाव समास (पहिले पद प्रधान)
ब) तत्पुरुष समास (दुसरे पद प्रधान)
क) व्दंव्द समास (दोन्ही पदे प्रधान)
ड) बहुव्रीही समास (दोन्ही पदे गौण)
अ) अव्ययीभाव समास
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’
अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये
– पहिले पद महत्वाचे असून ते श्यक्यतो अव्यय असते.
– संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो.
– हे शब्द श्यक्यतो स्थळ / काळ किंवा रीतिवाचक असतात.
-मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत. उदा – जागोजागी- प्रत्येक जागी.
मराठी भाषेतील शब्द
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | वारंवार | प्रत्येक वारी |
२ | पानोपानी | प्रत्येक पानी |
३ | गावोगाव | प्रत्येक गावात |
४ | दारोदारी | प्रत्येक दारी |
५ | घरोघरी | प्रत्येक घरी |
६ | दिवसेंदिवस | प्रत्येक दिवशी |
७ | गल्लोगल्ली | प्रत्येक गल्लीत |
८ | घडोघडी | प्रत्येक घडीला |
९ | जागोजाग | प्रत्येक जागी |
१० | आळोआळी | प्रत्येक आळीत |
संस्कृत भाषेतील शब्द
(आ, यथा, प्रति यासारखे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द)
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | यथायुक्त | युक्त असे |
२ | यथाशास्त्र | शास्त्राप्रमाणे |
३ | यथायोग्य | योग्य असे |
४ | यावज्जीव | जीव असेपर्यंत |
५ | आमरण | मरेपर्यंत |
६ | यथावकाश | अवकाशाप्रमाणे |
७ | यथान्याय | न्यायाप्रमाणे |
८ | यथाविधी | विधीप्रमाणे |
९ | प्रतिदिन | प्रत्येक दिवसाला |
१० | प्रतिमास | प्रत्येक महिन्याला |
अरबी व फारसी भाषेतील शब्द
(बे, दर, बेला, गैर, बिन, हर, यासारखे फारशी/ अरबी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द)
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | दरसाल | प्रत्येक साली |
२ | हरघडी | प्रत्येक घडीला |
३ | दरसाल | प्रत्येक साली |
४ | गैरहजर | हजर नसलेला |
५ | गैरवाजवी | वाजवी नसलेला |
६ | बेकायदा | कायद्या विरूद्ध |
७ | बेसुमार | सुमार नसलेले |
८ | गैरशिस्त | शिस्त नसलेला |
९ | बरहुकूम | हुकुमाप्रमाणे |
१० | बिनशर्त | शर्तीशिवाय |
ब) तत्पुरुष समास
ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये
-या समासात दुसरे पद महत्वाचे असते.
-अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो.
तत्पुरुष समासाचे सात उपप्रकर पडतात.
१) विभक्ती तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अथवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | देशगत | देशाला गेलेला ( द्वितीया/ कर्म तत्पुरुष ) |
२ | सुखप्राप्त | सुखाला प्राप्त ( द्वितीया/ कर्म तत्पुरुष ) |
३ | भक्तिवश | भक्तीने वश ( तृतीया/ करण तत्पुरुष ) |
४ | उपासमार | उपासने मार ( तृतीया/ करण तत्पुरुष ) |
५ | सचिवालय | सचिवासाठी आलय ( चतुर्थी/ संप्रदान तत्पुरुष ) |
६ | गायरान | गाईसाठी रान ( चतुर्थी/ संप्रदान तत्पुरुष ) |
७ | रोगमुक्त | रोगातून मुक्त ( पंचमी/ अपादान तत्पुरुष ) |
८ | सेवानिवृत्त | सेवेतून निवृत्त ( पंचमी/ अपादान तत्पुरुष ) |
९ | ऋणमुक्त | ऋणातून मुक्त ( पंचमी/ अपादान तत्पुरुष ) |
१० | नदीकाठ | नदीचा काठ ( षष्ठी/ संबंध तत्पुरुष ) |
११ | राजवाडा | राजाचा वाडा ( षष्ठी/ संबंध तत्पुरुष ) |
१२ | प्रेमपत्र | प्रेमाचे पत्र ( षष्ठी/ संबंध तत्पुरुष ) |
१३ | दानशूर | दानात शूर ( सप्तमी/ अधिकरण तत्पुरुष ) |
१४ | कलाकुशल | कलेत कुशल ( सप्तमी/ अधिकरण तत्पुरुष ) |
१५ | घरजावई | घरातील जावई ( सप्तमी/ अधिकरण तत्पुरुष ) |
२) अलुक तत्पुरुष
ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
उदा-
तोंडी लावणे
पाठी घालणे
युधिष्ठीर
कर्तरीप्रयोग
कर्मणी प्रयोग
३) उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात पहिले पद गौण असते तर दुसरे पद महत्वाचे असते व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा सामासिक शब्दाला उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.
उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | शेतकरी | शेती करणारा |
२ | आगलाव्या | आग लावणारा |
३ | सुखद | सुख देणारा |
४ | मार्गस्थ | मार्गावर असलेला |
५ | लाचखाऊ | लाच खाणारा |
४) नत्र तत्पुरुष समास
ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शविते त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.) म्हणजेच ज्या तत्पुरुष सामासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात.
नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | अहिंसा | हिंसा नसलेला |
२ | बेडर | डर नसलेला |
३ | निरोगी | रोग नसलेला |
४ | अनादर | आदर नसलेला |
५ | अयोग्य | योग्य नसलेला |
५) कर्मधारय तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
कर्मधारय तत्पुरुष समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | महादेव | महान असा देव |
२ | रक्तचंदन | रक्तासारखे चंदन |
३ | भोलानाथ | भोळा असा नाथ |
४ | नील कमल | नील असे कमल |
५ | महाराष्ट्र | महान असे राष्ट्र |
कर्मधारय समासाचे पुढील सात उपप्रकर पडतात.
१) विशेषण पूर्वपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते, तेव्हा अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.
उदा.
महादेव – महान असा देव
नीलकमल- निळे असे कमल
महाराष्ट्र – महान असे राष्ट्र
महामानव – महान असा मानव
२) विशेषण उत्तरपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद हे विशेषण असते, तेव्हा अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात.
उदा.
पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
मुखकमल – मुख हेच कमल
वेशांतर – अन्य असा वेश
भाषांतर – अन्य अशी भाषा
३) विशेषण उभयपद कर्मधारय
काही कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा सामासिक शब्दाला / समासाला विशेषण उभयपद कर्मधरय असे म्हणतात.
उदा.
लालभडक – लाल भडक असा
श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
हिरवागार – हिरवागार असा
४) उपमान पूर्वपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते (पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते) आणि उत्तरपद विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
देवबुद्धी- देव आहे अशी बुद्धी.
सूडबुद्धी – सूड आहे अशी बुद्धी.
घटशब्द- घट असा शब्द
५) उपमान उत्तरपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते (उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते) व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
नरसिंह – सिंहासारखा नर
६) रूपक उभयपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत सामंत नसून ते एकाच आहे असे जेव्हा दाखवले जाते तेव्हा त्या समासास रूपक उभयपद कर्मधारय समासअसे म्हणतात.
उदा.
विधाधन – विधा हेच धन
यशोधन – यश हेच धन
तपोबल – ताप हेच बल
७) अव्यय पूर्वपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.
उदा.
सुयोग – सु (चांगला) असा योग
सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र
६) व्दिगू समास
मराठी व्याकरणामध्ये ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून त्या शब्दाच्या योगाने ( सहाय्याने ) समुदायाचा अर्थ उत्पन्न होतो तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात.
व्दिगू समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | पंचवटी | पाच वडांचा समूह |
२ | त्रिदल | तीन दलांचा समूह |
३ | त्रैलोक्य | तीन लोकांचा समूह |
४ | नवरात्र | नऊ रात्रींचा समूह |
५ | पंचपाळे | पाच पाळ्यांचा समूह |
६ | चातुर्मास | चार मासांचा समूह |
७ | सप्ताह | सात दिवसांचा समूह |
८ | पंचारती | पाच आरत्यांचा समूह |
९ | सप्तरंग | सात रंगांचा समूह |
१० | सप्तर्षी | सात ऋषींचा समूह |
७) मध्यमलोपी समास
मराठी व्याकरणामध्ये ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदांचा दुसर्यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात.
मध्यमलोपी समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | कांदेपोहे | कांदे घालून केलेले पोहे |
२ | वांगीभात | वांगी घालून केलेला भात |
३ | साखरभात | साखर घालून केलेला भात |
४ | पुरणपोळी | पुरण घालून केलेली पोळी |
५ | गुळांबा | गूळ घालून केलेला आंबा |
क) व्दंव्द समास
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या दर्जाने समान असतात, त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
व्दंव्द समासाची वैशिष्ट्ये-
– दोन्ही पदे महत्वाची असतात.
-सामासिक शब्दचा विग्रह आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी करतात.
– दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केलेला असतो.
व्दंव्द समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | पशुपक्षी | पशू आणि पक्षी |
२ | दहीभात | दही आणि भात |
३ | भाजीपाला | भाजी, पाला व इतर तत्सम वस्तू |
४ | मागेपुढे | मागे किंवा पुढे |
५ | कृष्णार्जुन | कृष्ण आणि अर्जुन |
६ | खरेखोटे | खरे किंवा खोटे |
७ | दक्षिणोत्तर | दक्षिण आणि उत्तर |
८ | पापपुण्य | पाप आणि पुण्य |
९ | बरेवाईट | बरे अथवा वाईट |
१० | रामलक्ष्मण | राम आणि लक्ष्मण |
१) इतरेतर व्दंव्द समास
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतांना ‘आणि, व ‘ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात त्या समासास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.
इतरेतर व्दंव्द समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | भीमार्जुन | भीम आणि अर्जुन |
२ | सुंठसाखर | सुंठ आणि साखर |
३ | बहीणभाऊ | बहीण आणि भाऊ |
४ | आईवडील | आई आणि वडील |
५ | अहिनकुल | आहि आणि नकुल |
२) वैकल्पिक व्दंव्द समास
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतांना ‘किंवा, अथवा, वा’ या विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
वैकल्पिक व्दंव्द समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | सत्यासत्य | सत्य किंवा असत्य |
२ | पासनापास | पास आणि नापास |
३ | छोट्यामोठ्या | छोट्या किंवा मोठ्या |
४ | चुकभूल | चूक अथवा भूल |
५ | सत्यासत्य | सत्य किंवा असत्य |
३) समाहार व्दंव्द समास
ज्या सामासिक शब्दांतील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
समाहार व्दंव्द समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | शेतीवाडी | शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता |
२ | मिठभाकर | मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी |
३ | चहापाणी | चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ |
४ | केरकचरा | केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ |
५ | जीवजंतू | जीव, जंतू व इतर किटक |
ड) बहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दांतील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
बहुव्रीही समासाची वैशिष्ट्ये-
-दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन्हीशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो.
-हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो.
बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | वक्रतुंड | वक्र आहे ज्याचे तुंड (तोंड) असा तो – गणपती |
२ | दशानन | दहा आहेत आनन ज्याला असा तो – रावण |
३ | चंद्रशेखर | चंद्र आहे शिखर ज्याच्या असा तो – शंकर |
४ | गजमुख | गजाचे आहे मुख ज्याला असा तो – गणपती |
५ | चक्रपाणि | चक्र आहे पाणित असा तो -विष्णू |
बहुव्रीही समासाचे खालीलप्रमाणे चार उपपक्रार पडतात.
१) विभक्ती बहुव्रीही समास-
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | गतप्राण | गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती |
२ | त्रिकोण | तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती |
३ | जितेंद्रिय | जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती |
४ | गजानन | गजाचे आहे आनन ज्याला तो – गणेश (षष्ठी प्रथमा ) |
५ | जितशत्रू | जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती |
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन उपप्रकार पडतात.
१) समानाधिकरण
ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात तेव्हा त्या समासास समानाधिकरण असे म्हणतात.
समानाधिकरण बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | लक्ष्मीकांत | लक्ष्मी आहे कांता ज्याची तो- विष्णू (प्रथमा) |
२ | नीलकंठ | नील आहे कंठ ज्याचा तो – शंकर (प्रथमा) |
३ | लंबोदर | लंब आहे उदर ज्याचे असा तो – गणपती (प्रथमा) |
२) व्याधिकरण-
ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत असतात तेव्हा त्या समासास व्याधिकरण असे म्हणतात.
व्याधिकरण बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | भालचंद्र | भाळी आहे चंद्र असा तो शंकर (सप्तमी -प्रथमा) |
२ | सुधाकर | सुधा आहे करात असा तो चंद्र (प्रथमा- सप्तमी ) |
३ | गजानन | गजाचे आहे आनन ज्याला तो – गणेश (षष्ठी प्रथमा ) |
२) नत्र बहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
नत्र बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | निरोगी | नाही रोग ज्याला तो |
२ | अनियमित | नियमित नाही असे ते |
३ | नीरस | नाही रस ज्यात ते |
४ | नास्तिक | नाही आस्तिक असा तो |
५ | अव्यय | नाही व्यय ज्याला तो |
३) सहबहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.
सहबहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | सवर्ण | वर्णासहित असा तो |
२ | सफल | फलाने सहित असे तो |
३ | सानंद | आनंदाने सहित असा जो |
४ | सबल | बलासहित आहे असा जो |
५ | सादर | आदराने सहित असा तो |
४) प्रादि बहुव्रीही समास
ज्या सामासिक शब्दाचे पहिले पद प्र, परा, अप, दुर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात.
प्रादि बहुव्रीही समासाची उदाहरणे
क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
१ | प्रबळ | अधिक बलवान असा तो |
२ | दुर्गुण | वाईट गुण असलेली व्यक्ती |
३ | प्रज्ञावंत | बुद्धी असलेला |
४ | सुलोचन | चांगले डोळे असलेला |
५ | सुमंगल | पवित्र आहे असे ते |