तुकोबारायांचे अभंग भाग -१२

/ तुकोबारायांचे अभंग

५५१

म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥

ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥

पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥

हिर्याय ऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥

५५२

अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥

त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥

प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥

तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥

५५३

पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥

अर्थ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥

देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥

तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥

५५४

भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥

भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥

होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥

तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥

५५५

जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥

नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥

कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥

तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥

५५६

कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥

नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥

नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥

नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥

तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥४॥

लोहगावांस परचक्रवेढा पडला – अभंग ३

५५७

न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥

काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥

परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥

तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥३॥

५५८

काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥

उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥

पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥

तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥

५५९

भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥

आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥

भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥

तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥

॥३॥

५६०

फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥१॥

पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥२॥

तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥

५६१

कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥

आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥

कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥२॥

तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥

५६२

आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥

न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥

वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥

तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥

५६३

दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥

विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥

उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥

तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥

५६४

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥

मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥

स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥

तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥

५६५

तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥

तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥

नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥

कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥

तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥

स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं – अभंग ७

५६६

मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥

चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥

कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥२॥

काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥३॥

कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥४॥

तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥५॥

५६७

काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥

किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥

झवे आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥२॥

तुका म्हणे येती बाईले असडे । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥३॥

५६८

गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥

भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥

खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥२॥

तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥३॥

५६९

आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥१॥

डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥

आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥२॥

हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं । देवापासीं ॥३॥

आतां आम्ही करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥४॥

तुका म्हणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥५॥

५७०

बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥

आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ध्रु.॥

किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥२॥

तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥३॥

५७१

न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥

उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥

जिवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥२॥

संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥३॥

तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥४॥

तुका म्हणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥५॥

५७२

कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥

देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥

मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥

तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥३॥

॥७॥

५७३

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥

करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥

काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥

तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥

५७४

इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥

नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥

मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥

तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥

५७५

साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥

परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥

देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥

तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥

५७६

आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥

मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥

कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥

सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥

आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥

तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥

५७७

रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥

तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥

गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥

तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥

५७८

थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥

घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥

चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥

आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥

५७९

अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥

म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥

ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥

तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥

५८०

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥

म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥

खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥

म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥

५८१

गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥

आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥

उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥

हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥

५८२

परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥

हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥

इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥

सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥

पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥

योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥

मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥६॥

तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥

५८३

मोहोर्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥

नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥

स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥

तुका म्हणे खोडी । देवमणी न देती दडी ॥३॥

५८४

मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥

बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥

येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥

तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥

५८५

भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥

धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥

बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥२॥

तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥

५८६

गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥

कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥

पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥

तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥

५८७

न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥

भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥

पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥२॥

तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥

५८८

पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥

अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥

आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥

तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥

५८९

दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥

झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥

सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥

तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥

५९०

वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥

जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥

काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥२॥

तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥

५९१

झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥

तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥

परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥

गार्हातण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥

५९२

वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥

संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.

संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥

तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥

५९३

येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥

घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥.

नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥

तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥

५९४.

करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥

देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.

शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥

तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

५९५.

ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥

करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.

असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥

वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥

५९६.

देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥

ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥.

वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥

तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥

५९७.

नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥

उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥.

नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥

तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥

५९८.

गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥

परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥.

मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥५॥

तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥

५९९.

द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥

माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥.

कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥

भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥

तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥

६००.

मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥

ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.

पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥

विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥

Share this Post