तुकोबारायांचे अभंग भाग -४

/ तुकोबारायांचे अभंग

१५१

फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥१॥

फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥

हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥

सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥

सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥

तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥

॥२॥

लखोटा – अभंग १

१५२

लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥

हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥२॥

अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥३॥

बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥४॥

पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥५॥

आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥६॥

नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥७॥

हुंबरी – अभंग १

१५३

तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥

सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥

चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥

अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥

रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥

जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥

याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥

॥१॥

हमामा – अभंग २

१५४

मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥

पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥

मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥

तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥

मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥

मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥

आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥

तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥

१५५

हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची ॥१॥

पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥

दुसर्‍या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥

तिसर्‍या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥

चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्‍यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाईं ॥४॥

हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई ॥५॥

॥२॥

गाई – अभंग १

१५६

आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥

वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥

वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥

चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥

तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥

कांडण – अभंग २

१५७

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥

आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥

एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥

सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥

उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥

तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥

१५८

सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥

मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥

वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥

कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥

तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥४॥

॥२॥

आडसण दळण – अभंग १

१५९

शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥

आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥

सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥

सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥

सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥

दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥

सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥

॥१॥

दळण – अभंग १

१६०

शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥

शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥

शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥

शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥

तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥

॥१॥

१६१

उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥

वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥

एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥

तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥

१६२

याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥

आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥

हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥

तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥

१६३

शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥

तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥

वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥

तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥

१६४

पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥१॥

धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥

आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥

तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥३॥

१६५

धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥

ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥

खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥

तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥

१६६

पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥

म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥

त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥

सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥

१६७

आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥

मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥

कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥२॥

बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥

१६८

गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥

आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥

न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥

तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥

हाल – अभंग २

१६९

यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥

हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥

नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥

तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥

१७०

बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥

मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥

येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥

तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥

॥२॥

सुतुतू – अभंग १

१७१

जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥१॥

घाली हुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥

खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥२॥

बळिया गांढ्या तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥३॥

हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥४॥

मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥५॥

आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची सांडोनि सोई ॥६॥

तुका म्हणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥७॥

॥१॥

१७२

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥

नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥

पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥

विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥

तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥

१७३

कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥

होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥

प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥

तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥

१७४

मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥

चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।

वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥

वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥

अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥

घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥

रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥

बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥

१७५

धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥१॥

अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयांप्रति येइल आतां ॥२॥

तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥३॥

१७६

तुम्ही गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥१॥

इंद्र चंद्र सूर्य ब्रम्हा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥

मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥२॥

तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥३॥

१७७

कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें जालें काई । एका तें का नेणसी ॥१॥

केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥

वोला खोडा खळि गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥२॥

चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥३॥

१७८

काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥

काय देवा यांसि व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥

सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥

तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभाळित ॥३॥

१७९

कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥

काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥

वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥

तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाडे ॥३॥

१८०

कवळाचिया सुखें । परब्रम्ह जालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥

कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥

घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥२॥

काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आम्ही ही सोंकलों ॥३॥

१८१

कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥१॥

वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥

ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥

तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥

१८२

बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥

नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥

बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥

तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥

१८३

बहु बरा बहु बरा । यासांगातें मळि चारा ॥१॥

म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥

बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥

पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥

१८४

घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥१॥

ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥

स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥२॥

मोहरी पांवा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥३॥

१८५

वळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥

नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥

नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥

तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥

१८६

म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥

चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥

न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥२॥

तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥३॥

१८७

तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥

नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥

घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥

१८८

कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥

तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥

तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥

तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥

टिपरी – अभंग ७

१८९

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥

लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥

वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥

१९०

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥

खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।

तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।

तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला ।

आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥३॥

रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एकचि घाई ।

तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥४॥

ब्राम्हणाचा पोर खेळिया एक भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां ।

तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एक चि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥५॥

आणीक खेळिये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा ।

पुढिलांची धरूनियां सोई रे । एक चि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥६॥

१९१

बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।

जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥

नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥

सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे ।

विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥

आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे ।

आंधळ्यासि डोळे पांगळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥३॥

१९२

दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ।

कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥१॥

कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे ।

सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥

संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे ।

हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥

विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे ।

निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥

प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे ।

नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥

रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे।

तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥

१९३

या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥१॥

फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥

हिंडती रानोरान भुजंगांत कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥

तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥

१९४

भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे ।

तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥

नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।

पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥

बळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे ।

पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥

संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे ।

भुक्तिमुक्ति फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥

दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।

न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥४॥

बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे ।

तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥५॥

१९५

पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे ।

टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥

चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काई रे ।

भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥

आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे ।

साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥२॥

भक्ताचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उट्या रे ।

सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥३॥

हरि हर ब्रम्हा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे ।

विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥४॥

वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे ।

तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥५॥

॥७॥

१९६

ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥१॥

मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥

उच्छिष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या ॥२॥

तुका म्हणे जोड जाली । ते हे माउली आमुची ॥३॥

१९७

कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां खोटें ॥१॥

परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥

तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥२॥

जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तें ही । तुज वाटे भूषण ॥३॥

१९८

भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्न एकवटा ।

देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥१॥

कैसा आळ घेसी । नव्हे तें चि करविसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥

आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करिना हा ।

तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरिसि म्हणे माता ॥२॥

त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान । उठोनियां बैसे ।

माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥

ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं ।

विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥

हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आलिंगन । आनंद भोजनीं ।

तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥

१९९

चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥

बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥

खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥

तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥

२००

नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥

नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥

तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥२॥

तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥३॥

Share this Post