विरामचिन्हे व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

आपण आपले विचार, भावना लिहून व्यक्त करतो. तसेच, आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. कथा, कादंबरी, नाटक उत्यादी साहित्यप्रकारांत अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. अशा सर्व ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा वापर झालेला आढळतो.

विरामचिन्हे हा शब्द विराम + चिन्ह = विरामचिन्हे असा तयार झाला आहे. यामध्ये शब्दामधील विराम म्हणजे  ‘थांबणे‘  व चिन्हे म्हणजे ‘खुणा‘ असा त्याचा अर्थ होतो.

भाषेमधील एखादा उतारा वाचत असताना विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक असते. एखादे वाक्य वाचत असताना काहीवेळा आपण थांबतो म्हणजेच विराम घेतो. हा विराम किती वेळ घ्यायचा हे विरामचिन्हांमुळे लक्षात येये.लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपले व  कोठे सुरु झाले, ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही. म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आपण बोलताना एकसारखे बोलत नाही, वाचतानाही सारखे वाचीत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात.

विरामचिन्हांचे प्रकार –

१) पूर्ण विराम ( . )  

२) अर्धविराम ( ; )

३) स्वल्पविराम ( , )

४) अपूर्ण विराम ( : )

५) प्रश्नचिन्ह  (? )

६) उद् गारचिन्ह ( ! )

७) अवतरण चिन्हे ( ‘  ’) ( “  ” )

८) संयोग चिन्ह ( – )

९) अपसारण चिन्ह  (– )

१०) लोप चिन्ह ( … )

११) विकल्प चिन्ह  ( / )

१२) दंड ( ।,॥ )

१) पूर्ण विराम ( . )  

अ) एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात.

उदा-

–  मोहन शाळेत गेला.

–  गीता गाणी म्हणते.

ब) एखाद्या नावामधील आद्याक्षरे किंवा संक्षिप्त रुपाच्या शेवटी पूर्णविराम वापरले जातात.

उदा :

–  वि. दा. सावरकर ( विनायक दामोदर सावरकर )

२) अर्धविराम ( ; )

दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम वापरतात.

उदा :

         –  ढग खूप गर्जत होते; पण पाऊस मात्र आला नाही.

         – त्याने खूप प्रयत्न केला; परंतु शर्यत हरला.

 ३) स्वल्पविराम ( , )

१) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास.

२) संबोधन दर्शविताना.

३) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखविण्यासाठी.

४) अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी.

उदा :

  • मधू , इकडे ये.
  • महाराज , मला माफ करा.
  • अनिलला मराठी , गणित, विज्ञान हे विषय आवडतात.

४) अपूर्ण विराम ( : )

वाक्य लिहताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील दयावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्ण विराम चिन्ह वापरतात.

उदा :

        – पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेः १, ८, १४, २७, ४०

५) प्रश्नचिन्ह  (? )

वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी (?) हे चिन्ह वापरतात. त्याला प्रश्नचिन्ह  म्हणतात.

उदा :

       – तू केव्हा आलास ?

        – तुझे नाव काय ?

६) उद् गारचिन्ह ( ! ) 

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणा-या शब्दाच्या शेवटी याचा उपयोग करतात म्हणजेच जेंव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष, आश्चर्य, दुःख इ. पैकी कोणती ही भावना व्यक्त करायची असते तेंव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी (!) हे उदगार चिन्ह देतात. तसेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात. म्हणून केवलप्रयोगी शब्दापुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते.

उदा :

  • अरेरे ! तो नापास झाला.
  • शाबास ! छान खेळलास.

७) अवतरण चिन्हे ( ‘  ’) ( “  ” )

महत्वाचे शब्द किंवा शब्द समूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे ( ‘  ’ ) ह्या किंवा ( “  ” ) ह्या चिन्हाने दाखवतात आणि या चिन्हांना अवतरण चिन्ह असे म्हणतात.

अ) एकेरी अवतरण चिन्ह ( ‘  ’ )

जेंव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

उदा :

  • मूलध्वनींना ‘वर्ग’ असे म्हणतात.

ब) दुहेरी अवतरण चिन्ह ( “  ” )

एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला बोलणार्याचे शब्द अधोरेखित करता येतात.

उदा :

       – तो म्हणाला, “मी येईन.”

८) संयोग चिन्ह ( – )

सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदामध्ये ( – ) ही खूण असते, तिला संयोगचिन्ह असे म्हणतात.दोन शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर व्याकरणामध्ये केला जातो.

अ) दोन शब्द जोडताना वापरतात.

    – विद्यार्थि – भांडार, प्रेम – विवाह

ब) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास

    – आजचा कार्यक्रम शाळे – पुढील पटांगणावर होईल.

९) अपसारण चिन्ह  (– )

वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा किंवा बाबींचा खुलासा किंवा स्पष्टीकरण करावयाच्या वेळी (-) या चिन्हाचा उपयोग करतात, त्यास अपसारणचिन्ह असे म्हणतात.

उदा :

  • तो मुलगा – ज्याने बक्षीस मिळविले – आपल्या शाळेत आहे.

 १०) लोप चिन्ह ( … ) 

जेंव्हा एखादे वाक्य बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास आपण बोलताना थोडे थांबतो तेंव्हा लोप चिन्ह वापरले जाते.

उदा :

  • मला हे पहायचं होतं, पण…

११) विकल्प चिन्ह  ( / )

वाक्यामध्ये विकल्प किंवा पर्याय दाखवण्यासाठी  ( / ) या चिन्हाचा उपयोग होतो.

उदा :

      –  सागर चहा / कॉफी पितो.

१२) दंड ( ।,॥ ) – ( एकेरी दंड । ),( दुहेरी दंड ॥ )

मराठी व्याकरणामध्ये ओवी, अभंग श्लोक यांचा शेवट दाखवण्यासाठी दंड वापरले जाते.

उदा :

  • देह देवाचे मंदिर | आत आत्मा परमेश्वर ।।
Share this Post