सर्वनाम

/ मराठी व्याकरण

नामाऐवजी जे शब्द वापरतात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. नामांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्वनाम वापरतात.

सर्वनामाचे पुढीलप्रमाणे सहा प्रकार आहेत.

१) पुरुषवाचक सर्वनाम-

पुरुषवाचक सर्वनामाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.

अ) प्रथम पुरुषवाचक

बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जे शब्द/ सर्वनामे वापरतो, ती सर्वनामे प्रथम पुरुषवाचक असतात.

उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः

मी सोमवारी गावाला जाणार आहे.

  आपण उद्या फिरायला जाऊ.

ब) द्वितीय पुरुषवाचक

एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता त्या व्यक्तीसाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामाना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

उदा.- तू , तुम्ही, आपण, स्वतः

तुम्ही कुठे जाणार ?

क) तृतीय पुरुषवाचक

ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे त्या व्यक्तीचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामाना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

उदा.- तो, ती, त्या, ते.

तो घरी गेला.

२) दर्शक सर्वनाम

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम म्हणतात.

उदा – हा, ही, हे, तो, ती, ते.

तो हुशार मुलगा आहे.

हा आमचा बैल आहे.

३) संबंधी सर्वनाम

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

संबंधी सर्वनामे मिश्रवाक्यात येतात, यामध्ये पहिले वाक्य हे गौण वाक्य असते आणि ते विशेषण वाक्याचे काम करते तर दुसरे वाक्य हे मुख्य वाक्य असते.

उदा – जो, जी, जे, ज्या

जो करेल , तो भरेल.

४) प्रश्नार्थक सर्वनाम

जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरतात, त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

 उदा – कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

त्याने काय केले ?

तो कोण आहे ?

५) सामान्य / अनिश्चित सर्वनाम

काय,कोण, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चितपने  सांगता येत नाही अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदा.

माझ्या मुठीत काय ते सांग पाहू!

कोणी कोणास वाईट बोलू नये.

६) आत्मवाचक सर्वनाम

वाक्यामध्ये ज्या सर्वनामांचा वापर स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.

उदा.मी स्वतःत्याला पहीले.

      आपण सर्वजण मिळून खेळायला जाऊ.

मराठीत नऊ मूळ सर्वनामे आहेत.

मी

तू

तो, ती , ते

हा, ही, हे ,

जो, जी, जे

कोण

काय

आपण

स्वतः

या नऊ सर्वनामांपैकी तीन सर्वनामे लिंगानुसार बदलतात.

    तो– तो, ती, ते

    हा– हा, ही, हे

    जो-जो, जी, जे

या नऊ सर्वनामांपैकी पाच सर्वनामे वचनानुसार बदलतात.

    मी– आम्ही

    तू– तुम्ही

    तो– तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)

    हा– हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)

    जो– जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

Share this Post