तुकोबारायांचे अभंग भाग -११

/ तुकोबारायांचे अभंग

५०१

सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥

अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥

बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥

तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥

५०२

उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥

वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥

केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥

लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥

५०३

पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥

तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥२॥

तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥

५०४

शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥

भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥

संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥

रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥

एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥

न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥

५०५

उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥

निउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥

पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥

अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥

दसरा – अभंग १

५०६

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।

गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥

या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।

ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥

अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें ।

म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥२॥

बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं ।

मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥३॥

ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।

मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥४॥

जयासाटीं ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे ।

अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥५॥

५०७

ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥१॥

सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौळ्या घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥

स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥२॥

भक्तिचिया काजा कैसा रूपासि आला । ब्रिदाचा तोडर चरणीं मिरविला ॥३॥

आरतें आरती ओवाळिली । वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥४॥

भावभक्तिबळें होसी कृपाळु देवा । तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥५॥

५०८

करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥

आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥

पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥

तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥

५०९

द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥

आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥

मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥

तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥

५१०

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥

विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥

चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥

तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥

५११

पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥

शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥

जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥

तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥

५१२

केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥

बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥

उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥२॥

तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥३॥

५१३

कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥

पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥

शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥

तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥

५१४

आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥

देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥

असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥२॥

तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥३॥

५१५

आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥

आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥

देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥

राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥

५१६

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥

कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥

तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥

५१७

कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥१॥

माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥

व्हावा ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥२॥

तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥३॥

५१८

जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥

गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥

नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥

भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥

सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥

वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥

तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥६॥

नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥

तुका म्हणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥

५१९

कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥

या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥

कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥

एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥

५२०

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥१॥

झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥

अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥

पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जेजेकार आनंदें ॥३॥

५२१

बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥

लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥

जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥

तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥

५२२

मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥१॥

विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥

सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥

तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥

५२३

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥

नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥

दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥

तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥

५२४

पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥

जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥

न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥

तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥३॥

५२५

भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥

पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥

तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥

५२६

तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥

लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥

काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥

५२७

पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥

पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥

जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥

दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥

सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥

म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥

५२८

कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥

पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥

न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥

काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥

काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥

तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥

५२९

कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥

कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥

येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥

लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥

५३०

उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥

देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥

आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥

तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥

५३१

आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥

पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥

ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥

तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥

५३२

न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥

लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥

जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥२॥

तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥

५३३

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥

तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥

माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥

तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥

५३४

काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥

बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥

आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥

तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥

५३५

देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥

तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥

मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥

तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥३॥

५३६

आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥१॥

सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥

तुका म्हणे वाचा वाईली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥

५३७

बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥१॥

भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥

तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥

५३८

अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥

जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥

तुका म्हणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥

५३९

संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥

शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥

तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥

५४०

देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥

तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥

तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥

५४१

काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥१॥

वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥

तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥

५४२

आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥१॥

अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥

अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥

काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥

तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥

५४३

कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥

अगा नारायणा निष्ठाय निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥

कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति कुंटे चि ना ॥२॥

तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥३॥

५४४

दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥

पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥

आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥

चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥

तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥४॥

५४५

वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥

ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥

नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥

मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥

तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥

५४६

नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥

देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥

नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥

तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥

तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥

५४७

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥

विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥

तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥३॥

५४८

पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥

शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥

क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥

कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥

तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥४॥

५४९

जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥

सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥

आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥

चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥

चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥४॥

तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥

५५०

करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥

जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥

जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥

तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥

Share this Post