उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्‍या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा.

मी गावी जाणर आहे पण जायला गाडी भेटत नाही.

मी वर्तमानपत्रे आणि मासिके वाचतो.

पाऊस चालू आहे म्हणून खेळता येत नाही.

तो गरीब आहे पण लोभी नाही.

उभायान्वयी अव्ययाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

अ) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

ब) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

अ) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

दोन स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्ये जी एकमेकांवर अवलंबून नसतील अश्या वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे चार उपप्रकार पडतात.

१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय –

समुच्चय करणे म्हणजे बेरीज करणे किंवा भर टाकणे. जी उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यात किंवा विधानात भर टाकण्याचे काम करतात, तेव्हा ती उभयान्वयी अव्यये  समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये असतात.

आणि, व, अन्, शिवाय, नि, आणखी, आणिक –  समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.

उदा. 

मी बागेत गेलो आणि पावसाला सुरवात झाली.

शाळेत क्रिकेट व कबड्डीचे सामने चालू आहेत.

मी बाजारातून फळे अन् भाजीपाला आणला.

मी मुलांसाठी नवीन कपडे घेतली शिवाय थोडी मिठाईसुद्धा घेतली.

२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय –

जेव्हा वाक्यांना जोडणारी उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवितात म्हणजेच पर्याय दर्शवितात, तेव्हा अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इ.

साहित्य आणण्यासाठी पुण्याला किंवा मुंबईला जावे लागेल.

तुम्ही मला ऑफिसमध्ये अथवा घरी भेटू शकता.

देह जावो अथवा राहो.

तू चहा घेणार की कॉफी ?

३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय –

न्यूनत्व म्हणजे कमीपणा. पहिल्या वाक्यातील उणीव ,कमीपणा किंवा दोष  दर्शविणारे दुसरे वाक्य ज्या अव्ययांनी जोडले जाते त्या अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यये असे म्हणतात.

 उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.

राहुलला ताप होता, बाकी सर्व ठीक.

रामने स्पर्धेत भाग घेतला, पण त्याला बक्षीस मिळाले नाही.

मारावे; परी कीर्ती रुपी उरावे.

पीक चांगले आले परंतु पाण्याविना वळून गेले.

४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय –

जर पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा किंवा कृतीचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्ये ज्या अव्ययांनी जोडली जातात त्या अव्ययांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात, अतएव  इत्यादी.

मी सहलीसाठी पैसे जमा केले नाहीत; म्हणून मी सहलीला येणार नाही.

मोहन आजारी आहे; म्हणून तो आज शाळेत आला नाही.

महेशने मन लावून अभ्यास केला नाही; म्हणून तो नापास झाला.

तुम्हाला घरी लवकर जात यावे; याकरिता गाडी मागविली.

 ब) असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्ये असतात, म्हणजेच जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक मुख्य वाक्य व दुसरे गौण वाक्य असते. या वाक्यात, अर्थाच्या दृष्टीने पहिले वाक्य दुसर्‍या वाक्यावर अवलंबून असते. अशा मुख्य व गौण  वाक्यानं जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

यांचे पुढील चार प्रकार पडतात.

१) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय –

ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा किंवा वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे हे गौण वाक्य स्पष्ट करते तेव्हा त्या वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.

मेथी म्हणून एक भाजी आहे.

एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.

गुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे.

२) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय –

जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याच्या कृतीचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा अशा वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.

तो अधिकारी बनवा; यावस्त त्यांनी खूप प्रयत्न केले.

त्याला पुण्याला जायचे आहे; सबब तो शाळेला येणार नाही.

चांगले उपचार मिळावेत; यास्तव तो नागपूरला गेला.

चांगले गुण मिळावेत;  म्हणून तो खूप अभ्यास करतो .

३) कारणबोधक उभयान्वयी अव्यय –

ज्या वाक्यांमध्ये मुख्य वाक्यातील घटनेचे किंवा क्रियेचे कारण गौण वाक्यामधून व्यक्त होते अशा वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात.

उदा. कारण, का, की इत्यादी.

त्याला शाळेत यायला उशीर झाला; कारण वेळेत गाडी भेटली नाही.

त्याला चांगले गुण मिळाले; कारण त्याने खूप अभ्यास केला.

त्याला पोलिसांनी अटक केली; कारण त्याने चोरी केली.

४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय –

काही वाक्यांमध्ये गौण वाक्यातील अटीचा किंवा संकेताचा परिणाम हा मुख्य वाक्यात दर्शविलेला असतो आणि अशी वाक्ये ज्या अव्ययांनी जोडली जातात त्या अव्यवयांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. जर-तर, जारी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी

जर तू पस झालास, तर तुला गाडी घेऊ.

जर पाऊस थांबला, तर क्रिकेटचा सामना सुरु होईल.

पास झालो, की पेढे वाटीन.

तू घरी आला की, आपण बागेत जाऊ.

Share this Post