लिंग व त्याचे प्रकार
लिंग विचार
नामाच्या स्वरूपावरून एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुष (नर) किंवा स्त्री (मादी) जातीची आहे की या दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात.
लिंगाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.
१) पुल्लिंग
२) स्त्रीलिंग
३) नपुसकलिंग
१) पुल्लिंग-
ज्या शब्दावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो तो शब्द पुल्लिंगी असतो.
उदा.- मुलगा, शिक्षक,बैल, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, दगड इ.
२) स्त्रीलिंग –
ज्या शब्दावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो तो शब्द स्त्रीलिंगी असतो.
उदा.- मुलगी, शिक्षिका,गाय, घोडी, चिमणी, खुर्ची, नदी, खिडकी, इमारत इ.
३) नपुंसकलिंग –
जेव्हा एखाद्या नामावरून पुरुष (नर) किंवा स्त्री (मादी) असा कोणताच बोध होत नसेल तर ते नपुंसकलिंगी मानतात.
उदा.- पुस्तक, फूल, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, घड्याळ इ.
लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदलासाठी काही नियम –
१) ‘आ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.
उदा.-
मुलगा – मुलगी – मूलगे
घोडा – घोडी – घोडे
कुत्रा – कुत्री – कुत्रे
२) काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ई / ईण प्रत्यय लागल्यामुळे त्यांचे स्त्रीलिंगी रूपे तयार होतात.
उदा.-
पाटील – पाटलीण
धोबी – धोबीण
वाघ – वाघीण
नट – नटी
दास – दासी
३) काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.
उदा.-
गोप – गोपी
तरुण – तरुणी
वानर – वानरी
बेडूक – बेडकी
४) काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लागला असता त्यांची स्त्रीलिंगी रूपे बनतात.
उदा.-
लोटा – लोटी
दांडा – दांडी
गाडा – गाडी
खडा – खडी
नळा – नळी
५) संस्कृतातून मराठीमध्ये आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून तयार होतात.
उदा.-
भगवान – भगवती
युवा – युवती
श्रीमान – श्रीमती
ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती
६) काही नामांची स्त्रीलिंगी रुपे ही स्वतंत्र असतात.
उदा.-
बाप – आई
सासरा – सासू
खोंड – कालवड
पुत्र – कन्या
बैल – गाय
बोकड – शेळी
पिता – माता
बोका – भाटी
पती – पत्नी
७) नाते दर्शविताना आ कारांन्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप हे ई कारांन्त होते.
उदा.-
मामा – मामी
काका – काकी
८) मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.
उदा.-
वेळ – वेळ
मूल – मूल – मूल
बाग – बाग
वीणा – वीणा
तंबाखू – तंबाखू
९) इतर भाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.
उदा.-
बुट(जोडा) – पुल्लिंगी
क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
पेन (लेखनी) – स्त्रीलिंगी
बूक (पुस्तक) – नपुसकलिंगी
१०) सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते.
उदा.-
देवघर – नपुसकलिंगी
वरणभात – पुल्लिंगी
भाजीभाकरी – स्त्रीलिंगी
भाजीपाला – पुल्लिंगी
११) काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच होतो.
उदा.-
टोळ
गरुड
सुरवंट
मासा
साप
कावळा
१२) काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो.
उदा.-
जळू
खार
घूस
माशी
सुसर
मगर
पाल
१३) काहीवेळा नाव वेगवेगळ्या अर्थाने वापरली जातात तेव्हा त्यांचे लिंगही वेगवेगळे असते.
उदा.-
माळ (हार) – स्त्रीलिंगी
माळ (मैदान) – पुल्लिंगी
हार (माळ) – पुल्लिंगी
हार (पराभव) – स्त्रीलिंगी