विशेषण

/ मराठी व्याकरण

नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा. रामाकडे पांढरा बैल आहे.

       महेश हा एक हुशार विद्यार्थी आहे.

       ती चांगली मुले आहेत.

       सुनीलकडे दहा पेन आहेत.

विशेषणाचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

अ) गुणवाचक विशेषण

ब) संख्यावाचक विशेषण

क) सार्वनामिक विशेषण

अ) गुणवाचक विशेषण

वाक्यामध्ये एखाद्या नामाचा कोणत्याही प्रकारचा विशेष गुण किंवा विशेष माहिती दर्शविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

शंकर शांत मुलगा आहे.

बागेत सुंदर फुले आहेत.

बागेत हिरवीगार झाडे आहेत.

राम भित्रा मुलगा आहे.

ब) संख्या विशेषण :

ज्या विशेषणांच्या साहाय्याने नामाची संख्या दर्शविली जाते अशा विशेषणांना संख्या विशेषण असे म्हणतात.

संख्या विशेषणाचे खालीलप्रमाणे पाच प्रकार आहेत.

१) गणना वाचक संख्या विशेषण

२) क्रम वाचक संख्या विशेषण

३) आवृत्ती वाचक संख्या विशेषण

४) पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण

५) अनिश्चित संख्या विशेषण

१) गणना वाचक संख्या विशेषण

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात

उदा.

कबड्डीच्या सरावासाठी आज वीस मुले अली होती.

आज वर्गात एकूण ३० विद्यार्थी आहेत.

संदीपला पाच भाषा बोलता येतात.

माझ्याजवळ १०० रुपये आहेत.

गणना वाचक संख्या विशेषणाचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात

१) पूर्णांक वाचक – एक, पंधरा , पाच, दहा, शंभर .

२) अपूर्णांक वाचक – पाऊण, अडीच,अर्धा, सव्वा, दीड.

३) साकल्य वाचक – चार मित्र, तीन बहिणी.

२)  क्रमवाचक संख्या विशेषण

वाक्यामध्ये एखादी वस्तू, व्यक्ती यांचा क्रम / क्रमांक दर्शविण्यासाठी ज्या विशेषणांचा उपयोग होतो, अशा विशेषणांना क्रमवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल आहे.

राहुलचा वर्गात पहिला क्रमांक आला.

दुसऱ्या क्रमांकाची बस पुण्याला जाईल.

३) आवृत्ती वाचक संख्या विशेषण

वाक्यामध्ये जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे ते दर्शविते त्यालाआवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात.

उदा.

आज सरावासाठी कालच्यापेक्षा चौपट मुले अली होती.

आज मी रोजच्यापेक्षा दुप्पट प्रवास केला.

त्या कापडाला दुहेरी रंग आहे.

४) पृथकत्व वाचक संख्या विशेषण

जी विशेषणे त्यांचा मूळ अर्थ न दर्शविता वेगळ्या अर्थाचा बोध करून देतात अशा विशेषणांना पृथकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

मुलांनी कबड्डीसाठी  सात-सात चा गट करा.

प्रत्येकाने तीन -तीन प्रश्न सोडवा.

प्रत्येक वर्गातून चार- चार विद्यार्थी निवडा.

५) अनिश्चित संख्या विशेषण

ज्या विशेषणाने एखाद्या नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.

मला थोडे धान्य पाहिजे.

मला काही मुले बागेत खेळताना दिसली.

सुरेशने भरपूर खरेदी केली.

क) सार्वनामिक विशेषण

कोणत्याही सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा.

त्यांचा मुलगा दहावीत शिकतो.

तिचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे.

सगळं साहित्य माझ्या घरी आहे.

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.

मी – माझा, माझी, माझे, माझ्या.

ती-तिचा, तिची, तिच्या, तिचे.

तू – तुझा, तुझी, तुझे, तुझ्या.

तो-त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या.

आम्ही – आमचा, आमची, आमचे.

तुम्ही-तुमचा, तुमचे , तुमच्या, तुमची

हा – असा, असला, इतका, एवढा, अमका

तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका

जो – जसा, जसला, जितका, जेवढा

कोण – कोणता, केवढा

Share this Post