वृत्ते- अक्षर छंदवृत्त आणि मुक्तछंद
अक्षर छंदवृत्ते
वृत्तप्रकारात छंद हा एक प्रकार आहे. छंदाच्या रचनेत गण मात्रांचे बंधन नसते. चरणातील अक्षरांची संख्या नियमित असते. पण तेही बंधन फार काटेकोरपणे पाळलेले नसते. छंदामध्ये अक्षर ऱ्हस्व असले तरी उच्चारायच्या वेळी त्याचा कल दिर्घत्वाकडे असतो. अभंग आणि ओवी हे मराठीतील सर्वात जुने आणि लोकप्रिय छंद आहेत.
१) अभंग :-
अभंगाचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.
अ) मोठा अभंग
आ) लहान अभंग
अ) मोठा अभंग :-
मोठ्या अभंगात चार चरण असून पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. दुस-या व तिस-या चरणांच्या शेवटी यमक असते.
उदा.
जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ॥
आ) लहान अभंग :-
लहान अभंगाला दोन चरण असतात व प्रत्येक चरणात सामान्यतःआठ अक्षरे असतात. क्वचित पहिल्या चरणात सहा किंवा सात अक्षरे असतात. दुस-या चरणात केव्हा केव्हा नऊ किंवा दहा अक्षरेही येतात. दोन्ही चरणांत यमक असते.
उदा.
जे जे बोले तैसा चाले । तो चि वहिले निवांत ।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥
२) ओवी-
ओवीला चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. आधुनिक ओवीला तीनच चरण असतात. चौथा चरण लहान असला की त्याला साडेतीन चरणी ओवी म्हणतात. चरणांतील अक्षरांचे बंधन फारच शिथिल असते. ओवीच्या पहिल्या तीन चरणांतील प्रत्येकात पाचपासून पंधरापर्यंत अक्षरे असतात व चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणांतील अक्षरांपेक्षा अधिक अक्षरे नसतात. अलीकडच्या ओव्यांत प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून दुस-या व चौथ्या चरणांचे यमक जुळविलेले असते.
उदा.
मन वढाय वढाय । यभ्या पिकातलं ढोर ॥
किती हाकला हाकला । फिरी येतं पिकांवर ॥
३) अनुष्टुभ्-
याच्या प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात व प्रत्येक चरणातील पाचवे अक्षर लघू असते. याच्या चरणांतील संख्या निश्चित ठरली असल्यामुळे हे मात्रावृत्त नव्हे. चरणातील लघुगुरुक्रम निश्चित नसल्यामुळे हे अक्षरगणवृत्त नव्हे.यातील प्रत्येक अक्षर दीर्घ उच्चारले जात नसल्यामुळे याला पूर्णपणे छंदही म्हणता येत नाही. अशी याची स्थिती आहे.
उदा.
गीताई माउली माझी ।तिचा मी बाळ नेणता ।
पडता पडता घेई । उचलूनि कडेवरी ॥
मुक्तछंद
अक्षरे , गण व यती, मात्रा यमक या प्रकारचे कोणतेच बंधन न स्वीकारता कवी आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पध्दतीने मांडू शकतो . अशा प्रकारची रचना छंदोरचनेच्या अनेक बंधनातून मुक्त असते. म्हणून या रचनाप्रकाराला ‘मुक्तछंद’ असे म्हणतात.
मुक्तछंदात छोटे छोटे चरण असतात. त्यांना ‘उपचरण’ किंवा ‘चरणक’ असेही म्हणतात. हा चरणक सामान्यतः पाच किंवा सहा अक्षरांचा असतो. क्वचित तो चार किंवा सात अक्षरांचाही असतो. एक चरणक किती असावे याचे बंधन नाही केव्हा दोन तर केव्हा एका ओळीत चार चरणकही असू शकतात अशा किती ओळींचे कडवे असावे याचेही बंधन नसते. कल्पना, विचार आणि भावना पुरी झाली की कडवे संपते. उदा.
वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते.