अलंकार

/ मराठी व्याकरण

भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात.

मराठीत आलेले बहुतेक भाषेचे अलंकार व प्रकार हे संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

भाषेच्या अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत :

अ) शब्दालंकार

ब) अर्थालंकार

अ) शब्दालंकार

शब्दालंकाराचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.

१) अनुप्रास

२) यमक

३)  श्लेष

१) अनुप्रास –

जर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणांमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा  त्या अलंकारास अनुप्रास अलंकार असे म्हणतात.

उदा.-

१) गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,

शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

२) आज गोकुळात रंग खेळतो हरी। राधिके जरा जपून जा तुझ्या घरी ।

२) यमक-

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी, वेगवेगळे अर्थ असणारे  परंतु उच्चारात समानता असणारे शब्द आल्यास जो नाद निर्माण होऊन भाषेला जे सौंदर्य  प्राप्त होते  त्यास यमक अलंकार असे म्हणतात.

उदा :

१) जाणावा तो ज्ञानी | पूर्ण समाधानी

निःसंदेह मनी | सर्वकाळ ||

 शब्द

२) सुसंगती सदा घडो, सुजाण वाक्य कानी पडो। कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो।

३) श्लेष

जेंव्हा एखाद्या वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थानी वापरल्यामुळे जी शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा त्या निर्माण होणाऱ्या अलंकारास श्लेष अलंकार असे म्हणतात.

उदा :

१) मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही ! (मित्र-सखा, मित्र-सूर्य)

२) श्रीकृष्ण नवरा मी नवरी। शिशुपाल नवरा मी न-वरी॥

ब) अर्थालंकार

अर्थालंकारामध्ये वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य  प्राप्त होते.

उपमेय- मूळ वस्तू  उपमान- गुणाने अधिक असणारी वस्तू

अर्थालंकाराचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात.

१)  उपमा

२) उत्प्रेक्षा

३) अपन्हुती

४) अनन्वय

५) रूपक

६) अतिशयोक्ती

७) दृष्टांत

८) विरोधाभास

९) चेतनगुणोक्ती

१०) अर्थान्तरन्यास

११) स्वभावोक्ती

१२) व्याजस्तुती

१३) पर्यायोक्ती

१४) सार

१५) अन्योक्ती

१६) ससंदेह

१७) भ्रान्तिमान

१८) व्यतिरेक  

१)  उपमा

जेंव्हा उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा‘ हा अलंकार असतो. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादातरी साधर्म्यसूचक असा शब्द असतो.

उदा :

१) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी !

२) असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी.

२) उत्प्रेक्षा

उपमेय हे जणू उपमान आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो.

उदा :

१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू !

२) त्याचे अक्षर जणूकाय मोतीच !

३) अपन्हुती

अपन्हुती म्हणजे लपविणे किंवा झाकणे.  उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते म्हणजेच उपमेय लपवून ते उपमानाच आहे असे जेथे दर्शविले  जाते  तेव्हा ‘अपन्हुती‘ हा अलंकार होतो.

उदा :

१) ओठ कशाचे ? देठाची फुलले पारिजातकाचे।

२) हा आंबा नाही, ही साखरच आहे.

४) अनन्वय

जेव्हा उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो.

उदा :

१) झाले बहु, होतील बहु , आहेत हि बहु , परंतु यासम हा।

२) आईसारखी आईच.

५) रूपक

उपमेय आणि उपमान  हे वेगळे नसून यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदा :

१) कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा.

२) देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर .

६) अतिशयोक्ती

जेव्हा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार निर्माण होतो.

उदा :

१) दमडीचं तेल आणलं,सासूबाईचं न्हाण झालं |

मामंजीची दाढी झाली,भावोजींची शेंडी झाली ||

उरलेलं तेल झाकून ठेवले,लांडोरीचा पाय लागला |

वेशीपर्यंत ओघळ गेला,त्यात उंट पोहून गेला ||

२) ती रडली समुद्राच्या समुद्र.

७) दृष्टांत

जेंव्हा एखादा विषय, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच त्याला साजेसा किंवा तशाच प्रकारचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त‘ अलंकार निर्माण होतो.

उदा :

१) लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा ।

    ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

२) निवडी वेगळे क्षीर आणि पाणी। राजहंस दोन्ही वेगळाली

    तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरागबाळाचे काम नोहे

८) विरोधाभास

जेंव्हा एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार निर्माण होतो.

उदा :

१) जरी आंधळी मी तुला पाहते.

२) मरणात खरोखर जग जगते

९) चेतनगुणोक्ती

जेव्हा एखादी निर्जीव (अचेतन ) वस्तू सजीव (सचेतन) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे जेथे  वर्णन केलेले असते तेथे ‘चेतनगुणोक्ती‘ हा अलंकार होतो.

उदा :

१) डोकी अलगद घरे उचलती

    काळोखाच्या उशीवरूनी

२) अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर !

१०) अर्थान्तरन्यास

जेव्हा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थान्तरन्यास अलंकार होतो.

१) कठीण समय येत कोण कामास येतो ?

११) स्वभावोक्ती

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेथे केले जाते तेथे स्वभावोक्ती अलंकार होतो.

उदा :

१) गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी

    म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी

   मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई

   भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई

२)  मातीत ते पसरले अति रम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक ॥

     चंचू तशीच उघडी पद लांबवीले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||

१२) व्याजस्तुती

जेव्हा बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन जेथे असते तेंव्हा व्याजमुक्ती अलंकार निर्माण होतो.

उदा :

१) होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती

   अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती?||

१३) पर्यायोक्ती

जेव्हा एखादी गोष्ट सरळसरळ न सांगता त्याएवची एखादा प्रातिनिधिक शब्द वापरून आडवळणाने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्ती अलंकार होतो.

उदा :

१) त्याचे वडील ‘सरकारी पाहुणचार‘ घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)

१४) सार

जेव्हा वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दाखवून उत्कर्ष  किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा सार हा अलंकार होतो.

उदा.

१) आधिच मर्कट तशातही मद्य प्याला

    झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला.

१५) अन्योक्ती

दुसऱ्याला उद्देशून केलेले भाष्य म्हणजे अन्योक्ती होय. जेव्हा ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याला लागेल असे पण दुसऱ्याला उद्देशून बोलले जाते तेव्हा अन्योक्ती  अलंकार होतो.

१) येथे समस्त बहिरे बसतात लोक

    का भाषणे मधुर तू करिशी अनेक

    हे मूर्ख यासि किमपीहि नसे विवेक

    रंगावरून तुजला म्हणतील काक

१६) ससंदेह

जेव्हा उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होतो तेव्हा तो अलंकार भ्रान्तिमानात अलंकार  असतो.

उदा :

१) कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा चंद्र कोणता वदन कोणते?

१७) भ्रान्तिमान

जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण करून दाखविला जातो तेव्हा भ्रांतिमान अलंकार होतो.

उदा :

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे ।  पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे ।।

घालीन अंजन अशा मतिने तटाकी । कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ।।

१८) व्यतिरेक  

जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते तेव्हा तो अलंकार व्यतिरेक अलंकार असतो.

उदा :

१) अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा

२) तू माउलीहुनी मायाळ । चंद्राहूनी शीतल ।।

    पाणियाहूनी पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।

Share this Post